करोनामुळे पितृपक्षातील “जेवणावळींना’ही ब्रेक

पिंपरी – यंदा करोनामुळे सर्वच सणांसह परंपरांवर गंडांतर आले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा पितृपंधरवडाही करोनामुळे अडचणीत आला आहे. वाडवडिलांना नैवेद्य दाखवून स्नेहींना दिल्या जाणाऱ्या भोजणावळींना यावर्षी ब्रेक लागल्याचेच चित्र आहे.

भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा या दिवसांत केली जाते. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत. त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही केली जात नाही. तर, या काळात पितृपंधरवडाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांना नैवद्य दाखवून स्नेहींना घरी बोलावून जेऊ घातले जाते. मात्र यावर्षी करोनामुळे दिवंगतांना नैवद्य दाखविला जात असला तरी स्नेहींना बोलावून जेऊ घालण्याची परंपरा मात्र खंडित झाली आहे. 

प्राचीन काळात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत.

सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्‍ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला.

भाद्रपदातील पौर्णिमा
2 सप्टेंबर 2020 रोजी होती. या दिवशी अगस्त ऋषींचे पूजन करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपंधरवडा किंवा पितृपक्षास सुरुवात झाली. पितृ पक्षातील प्रत्येक तिथीला श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे.

पितृपंधरवडा गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी समाप्त होईल. मात्र, यंदा अश्‍विन महिना अधिक असल्याने घटस्थापना एका महिन्याने होणार आहे. 

यंदा करोनाच्या संकटामुळे दिवंगत पूर्वजांचे श्राद्ध घालताना पंगतीने लोकांना जेवण घालण्याची परंपरा बंद करावी लागली आहे. मात्र, पार्सल रूपाने अन्नदान केले किंवा पूर्वजांना नैवेद्य साध्या पद्धतीने जरी दिला, तरी कुठलीही धार्मिक अडचण येत नाही. करोना काळात लोकांनी गर्दी न करता श्राद्ध साध्या पद्धतीने घालावे व आपली परंपरा अखंडितपणे सुरू ठेवावी
– मनोजदास महाराज बैरागी, वैष्णव पुरोहित

Leave A Reply

Your email address will not be published.