वॉशिंग्टन – सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यावर करोनाचा विषाणू लवकर समाप्त होतो, असा नवा निष्कर्ष अमेरिकेतील तज्ज्ञांनी काढला आहे. तसे जर असेल तर आताच एप्रिल आणि आगामी मे महिन्यातील प्रखर उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे. अर्थात या निष्कर्षाची अजून फेरपडताळणी केली जात असल्यामुळे ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत.
अमेरिकेच्या होमलॅंड सिक्युरिटीच्या सायन्स आणि टेक्नालॉजी विभागाचे सल्लागार विल्यम ब्रायन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हवेतच या विषाणूला मारण्याची क्षमता प्रकाश किरणात असल्याचे आमच्या आतापर्यंतच्या अभ्यासात निदर्शनास आले आहे.
त्यांनी नॅशनल बायोडिफेन्सचा एक अहवालही यावेळी समोर ठेवला. त्यानुसार 21 ते 24 डिग्री तापमानात 18 तासांत हा विषाणू अर्धमेला होत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच दरवाजाचे हॅंडल अथवा स्टेनलेस स्टीलवरील विषाणू नष्ट होण्यासाठी सहा तास लागतो. मात्र सूर्यकिरणाच्या संपर्कात येताच दोन मिनिटांत त्याचा खातमा होतो. ब्रायन पुढे म्हणाले की, उन्हाळ्याच्या काळात असे वातावरण निर्माण होईल की, या विषाणूचा फारसा फैलाव होणार नाही.
अर्थात तापमान वाढले की विषाणू पूर्ण नष्ट हाईल आणि सगळे त्याच्या जाचातून मुक्त होतील असे मानणे बेजबाबदारपणाचे असेल, असा सावधगीरीचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नागरिकांनी सरकारकडून ज्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, त्याचे पालन करणेही आवश्यक असून त्यात सोशल डिस्टन्सला सगळ्यांत महत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर अजून संशोधन सुरू असून नंतरच त्याबाबतची सविस्तर अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.