नवी दिल्ली – “रॅपिड टेस्ट किट’ पुरवणाऱ्या चिनी औषध कंपन्यांनी भारतातील एजन्सींना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. चिनी कंपन्यांनी 5.5 लाख “रॅपिड टेस्ट किट’पुरवली आहेत. या “रॅपिड टेस्ट किट’चा दर्जा सुमार असल्याची टीका भारतातील एजन्सींकडून व्हायला लागल्यावर चिनी कंपन्यांनी ही तयारी दर्शवली आहे.
चीनमधील गुवान्गझोउ वोंडफो बायोटेक आणि लिवझोन डायग्नोस्टिक या कंपन्यांनी स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये आपली टेस्ट किट उत्तम गुणवत्ता मानकानुसार असल्याचा दावा केला आहे. तसेच या किटच्या साठवणुकीसाठी तसेच त्यांचे अचूक परिणाम मिळण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन केले जायला पाहिजे, असेही कंपन्यांनी म्हटले आहे.
या किटच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी तपासून बघेपर्यंत आणखी दोन दिवसांसाठी या टेस्ट किटचा वापर थांबवण्यात यावा, अशी सूचना “आयसीएमआर’ने मंगळवारी राज्यांना केली आहे. भारताने खरेदी केलेली 5.5 लाख रॅपिड टेस्ट किट करोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी घेण्यासाठी विविध राज्यांना दिली आहेत.