वेतन पालिकेचे काम इतर विभागाचे : महापालिका आयुक्तांचा इशारा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील 43 कर्मचारी निवडणूक, सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात नियुक्त आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ महापालिका प्रशासन सेवेत रुजू व्हावे, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. हे कर्मचारी महापालिका सेवेत रुजू झाले नाही तर त्यांना डिसेंबर महिन्याचा पगार देण्यात येऊ नये असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणारे काही कर्मचारी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत. महापालिका आस्थापनेतील 43 कर्मचारी इतर शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे महापालिकेने मागितलेल्या माहितीमध्ये समोर आले. त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या संबंधित निवडणूक कार्यालयामार्फत तसेच प्रशासन विभागाकडील आदेशानुसार निवडणूक विभागात करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन महापलिकेच्या कोषागारातून दिले जाते.
महापालिका प्रादेशिक कार्यक्षेत्राचा विस्तार व कामकाजाचा व्याप वाढलेला आहे. नागरिकांची कामे जलदगतीने होण्यासाठी महापालिका आस्थापनेवर कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. तसेच महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा आणि इतर कारणांमुळे घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाज करून घेताना अडचणी येतात. परिणामी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
विधानसभा 2019 चे कामकाज संपले असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ विभागात रुजू होणे आवश्यक आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी तत्काळ महापालिका प्रशासन विभागात रुजू व्हावे, असा आदेश आयुक्तांनी काढला आहे. यासोबतच, जे कर्मचारी महापालिकेत रुजू होणार नाही, अथवा विनापरवाना गैरहजर राहतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना डिसेंबर महिन्याचा पगार देण्यात येऊ नये असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.