पुणे – महापालिकेच्या वतीने हाती घेतलेले प्रकल्प आणि योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ आणि पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुखांकडून शुक्रवारी घेतला. प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सूचनाही दिल्या.
महापौरांच्या उपस्थितीत उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृहनेते धीरज घाटे यांनी प्रकल्प आणि योजनांचा सविस्तर आढावा घेतला. महापौर बंगल्यावर सलग पाच तास झालेल्या “मॅरेथॉन बैठकी’ला आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष नयना गुंडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सीएनजी बसेस भाडेतत्त्वावर घेणार
पुढील वर्ष अखेर शहरात 2500 बसेस रस्त्यावर असतील. सीएनजी बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. बस डेपोसाठी त्यांना 75 एकर जागा लागणार आहे. यापैकी 45 एकर जागा पुणे महापालिका देणार आहे. मालमत्ता विभागाने याची पूर्तता करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी सूचना केल्याचे मोहोळ म्हणाले.
45 रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त
पंचवटी ते पाषाण बोगद्याला लष्कराचा विरोध आहे. संरक्षण खात्याशी या संदर्भात चर्चा करण्यात येईल. बालगंधर्व रंगमंदिरसाठी समिती नेमली आहे. लवकरच बैठक घेऊन पुनर्विकास कसा करायचा यावर अंतिम निर्णय होईल. शहरातील 45 रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याबाबत चर्चा झाली. फुटपाथवरील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करण्यात येईल. शिवसृष्टी प्रकल्प पूढे नेण्यासंदर्भात चर्चा झाली. शिक्षण मंडळातील वेतनश्रेणी, पदोन्नती या विषयांवर चर्चा झाल्याचे मोहोळ म्हणाले.
जायका, एचसीएमटीआर प्रकल्पाकडे सकारात्मक पाहा
जायका कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाची माहिती घेतली. या कामाचे जे पूर्वगणनापत्रक केले आहेत यात तफावत आहे. याचा खुलासा प्रशासनाकडून मागितला आहे. सल्लागाराच्या दृष्टीने 23 ते 25 टक्के अधिक आहे तर, महापालिका म्हणते 40 टक्क्यांहून अधिक दर आहे. हा प्रकल्प लवकर व्हावा यासाठी संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प होण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. एचसीएमटीआर प्रकल्पासाठी भूसंपादन, पर्यावरण, खर्च याचा एकत्रित विचार करून या प्रकल्पाबाबत नागरिकांसमोर पारदर्शीपणे मांडावे, अशीही सूचना केली.
काम न करणाऱ्या “जैन इरिगेशन’वर कारवाईचा इशारा
चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेत 1,750 किमी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यातील आतापर्यंत 143 किमीचे काम झाले आहे. वास्तविक आजमितीला किमान 300 किमीचे काम होणे अपेक्षित होते. परंतु, “जैन इरिगशन’ या कंपनीचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यांना अनेकदा नोटीस बजावून 40 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. एकूण 82 टाक्क्यांचे काम करायचे आहे. पैकी 26 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. 10 टाक्यांचे काम 90 टक्के झाले आहे तर, 15 टाक्यांचे काम 60-70 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित 14 टाक्यांचे कामासाठी जागा ताब्यात येणे बाकी आहे. भूसंपादना अभावी हे काम रखडले आहे. त्याची सकारण माहिती मागितली असून, पदाधिकाऱ्यांकडूनही पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रशासनाला सांगितल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजना, पीएमपीएमएल सक्षमीकरण व अतिक्रमण
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2 हजार घरांची सोडत काढण्यात येईल. वडगाव येथील प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल. तसेच शहरात या योजनेंतर्गत 1 लाखांहून अधिक घरे बांधण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.