कॉंग्रेसच्या मुख्यालयावर प्राप्तीकर विभागाचे छापे

लेखापाल विभागाला ठोकले टाळे

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात कॉंग्रेस अडचणीत आली असून प्राप्तीकर विभागाने कॉंग्रेसच्या मुख्य लेखा विभागावर छापे टाकले आहेत. याचबरोबर लेखा विभागात कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जाण्याच्या काळात छापे टाकून लेखा विभाग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई राजकीय सूडभावनेतूनच करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असलेल्या कॉंग्रेसला शनिवारी धक्का बसला. दिल्लीतील, अकबर रोडवरील कॉंग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. या कारवाईनंतर विभागाने लेखा विभागाला टाळे लावले असून, या विभागात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या घरीही छापे टाकले आहेत.

मॅथ्यू वर्गीस यांच्यासह चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वर्गीस गेल्या चार दशकांपासून कॉंग्रेसच्या लेखा विभागात कार्यरत असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी दिली. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन प्राप्तिकर अधिकारी विचारपूस करीत आहेत. त्याच वेळी कॉंग्रेसच्या लेखा विभागालाही प्राप्तिकर खात्याने टाळे ठोकले आहेत. पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कॉंग्रेसच्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने छापे घालण्यात येत आहेत, ही शरमेची गोष्ट असल्याचे कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.या देशात विरोधकांसाठी एक आणि भाजपसाठी दुसरी अशा दोन नियमावली, दोन कायदे, दोन घटना आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी वाईट बातमी आहे अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीच्या काळात पक्षाच्या प्रचारासाठी आणि उमेदवारांसाठी लागणारा निधीही खर्च करण्यापासून कॉंग्रेस पक्षाला रोखले जात आहे. हे सरकार राजकीय सूडबुद्धीने काम करत आहे. निवडक राजकीय विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. हे फक्त केवळ कॉंग्रेस आणि कॉंग्रेस नेत्यांसोबतच केलं जात नाही. तर गेल्या काही वर्षात भाजपाच्या विरोधात असलेल्या कॉंग्रेससह तृणमूल, टीडीपी, बसपा, सपा या पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप शर्मा यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)