मुंबई – सध्या संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘सबसे कातील गौतमी पाटील…’ दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. दरम्यान गेले काही दिवस गौतमीची चर्चा कमी झाली होती. तिचे शो देखील बंद होते. मात्र, आता पुन्हा एकदा गौतमीने आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांना घायाळ करण्यास सुरुवात केली आहे.
बऱ्याच दिवसांनंतर म्हणजेच, दि. 1 ऑगस्टला गौतमी पाटीलचा शो अहमदनगरच्या नागापूरमध्ये झाला. यावेळी नेहमी प्रमाणे तिच्या शोमध्ये तरुणांची तुफान गर्दी झाली होती. अगदी लहान मुलांपासून महिला आणि वृध्दांपर्यंत सर्वच या कार्यक्रमात आले होते. तिचा डान्स सुरु असतांनाच कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ सुरु केला. तर काहींनी किरकोळ दगडफेक केली.
त्या कार्यक्रमात दगड लागल्यामुळे एक महिला देखील जखमी झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर खासगी बाऊन्सर्स यांनी लगेचच वातावरण शांत केलं. मात्र त्यानंतर डान्स शो पुन्हा सुरु करण्यात आला नाही. गौतमीचा शो तिथेच बंद करण्यात आला. दरम्यान, या सर्व गोंधळामुळे कार्यक्रम रद्द झाल्यानंतर गौतमी पाटीलं तिची भावना व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना गौतमी म्हणाली की, ‘आज खुप दिवसांनी माझा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची खुप गर्दी असते. त्यामुळे मागच्या प्रेक्षकांना डान्स दिसत नाही. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. कार्यक्रम छान झाला मात्र गोंधळामुळे मी कार्यक्रम लगेच बंद केला.
मी प्रत्येक आयोजकाला चांगल्याप्रकारे आयोजन करा असं सांगते. जर कार्यक्रमात असाच गोंधळ होत असेल तर मी यापुढे कार्यक्रम करणार नाही. कार्यक्रम करणं बंद करेल. जर कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित नसेल तर गौतमी यापुढे तिचे डान्स शो करणार नाही.’ असं देखील यावेळी गौतमी पाटील बोलली.