नवी दिल्ली – मी भारतात ड्रायव्हरविरहित कार कधीही येऊ देणार नाही. कारण अनेक लोकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि मी तसे होऊ देणार नाही. भारतात टेस्लाचे स्वागत आहे, पण चीनमधील उत्पादन भारतात विक्रीसाठी मान्य नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
मानवतेच्या हितासाठी अशा प्रकारच्या वाहनांना विरोध असल्याचे मत गडकरी यांनी यावेळी मांडले.झिरो माइल डायलॉगमध्ये गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, ‘मला अनेकदा ड्रायव्हरलेस वाहनांबद्दल विचारले जाते. मग मी म्हणतो, जोपर्यंत मी परिवहन मंत्री आहे, तोपर्यंत तुम्ही याबाबत काहीच बोलू नका.”
गडकरी पुढे म्हणाले,”जगात अनेक ठिकाणी ड्रायव्हरलेस कारची चाचणी केली जात आहे. गुगलसह अनेक मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस वाहने रस्त्यावर कशा ठेवता येतील यावर काम करत आहेत. असे केल्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अपघात कमी करता येतील, असा विश्वास आहे.”