पुणे(प्रतिनिधी) – चेन्नई एक्सप्रेसमधून 279 कासवे, 1207 इग्वाना (सरडे) आणि 230 बेटा फिश माशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा अंदाच व्यक्त केला जातो आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ते या प्राण्याची वाहतूक कशासाठी करत होतो. यामध्ये इतर कोण सहभागी आहे याचा तपास पोलिस करत आहेत. तरुणकुमार मोहन ( 26, रा. लेनीननगर, अंबतूर, चेईन्न्) आणि श्रीनिवासन कमल (20 , रा. कोल्लातूर, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांना सुचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसापासून पथके गस्तीवर होती.
दरम्यान पुणे ते लोणावळा प्रवासात चेन्नई एल टी टी एक्सप्रेसमधील ए/1 बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करून 4 ट्रॅव्हल बॅगा व दोन सॅगबॅकची तपासणी केली असता, त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश आढळून आल्या. त्यांना प्राण्याची वाहतूक करत असलेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बॅंगांसह ताब्यात घेण्यात आले.