स्मिता अष्टेकर सुपा पोलिसांच्या ताब्यात

इंदुरीकर महाराज, देसाई वादाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई

सुपा – निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई या आज नगरला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आल्या होत्या. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यापूर्वी शिवसेनेच्या स्मिता आष्टेकर यांनी देसाई यांना नगरला आल्यास फटके देईल, असा इशारा दिला होता.

त्या पार्श्‍वभूमीवर आज सुपा व भिंगार कॅंप पोलिसांनी अष्टेकर यांना सुपा टोलनाक्‍यावरून ताब्यात घेतले. देसाई यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्या आज नगरला आल्या होत्या. त्यापूर्वीच अष्टेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी देसाई यांना नगरला आल्यावर फटके देईल, असा दम दिला होता. देसाई यांनीही मी कुठेही यायला तयार आहे, असे प्रतिआव्हान दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी तृप्ती देसाई नगरला येणार आसल्याचे समजताच अष्टेकर या नगर-श्रीगोंदा तालुक्‍यातील आडमार्गाच्या गावातून सुपा टोलनाका येथे आल्या असता, त्यांच्या मागावर असलेल्या भिंगार कॅंप पोलीस व सुपा पोलिसानी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुपा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अष्टेकर यांच्यासह वाहनचालक व त्यांच्या सहकारी कमल जाधव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आष्टेकर म्हणाल्या, देसाई या जाणूनबुजून आमच्या धर्माला बदनाम करत आहेत. प्रसिद्धीसाठी आमच्या धर्माची बदनामी करत आहेत. अलीकडील काळात महिलांवर अनेक आत्याचाराच्या घटना घडल्या, तेव्हा त्या कोठे होत्या. त्यांच्यात हिम्मत असेल, तर त्यांनी इतर धर्मांविषयी बोलावे किंवा त्यांच्या धार्मिक स्थळांवर महिलांना घेऊन जावे, असेही अष्टेकर म्हणाल्या. अष्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर दुपारपर्यंत कुठलाही गुन्हा नोंदवला नव्हता. रात्री उशिरा त्यांना सहकाऱ्यांना सोडून देण्यात आले.

तृप्ती देसाई आज जरी पोलिस बंदोबस्तात पळाल्या असल्या, तरी मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन फटकावणार आहे. माझ्या धर्मावर व आमच्या अध्यात्मिक गुरूंवर बोलणाऱ्या त्या कोण? हिंगणघाट घटनेच्या वेळी त्या कुठे गेल्या होत्या.

स्मिता अष्टेकर शिवसेना नेत्या

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.