भुसावळ – प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमधील शौचालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मेल सेन्सर (गंध सेन्सर) बसवले आहेत. गाडीतील शौचालयांची वेळेवर स्वच्छता न झाल्यास दुर्गंधी वाढते. अशा वेळी स्मेल सेन्सर प्रणालीद्वारे हाऊसकिपिंग कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर संदेश मिळेल. यानंतर दुर्गंधीयुक्त शौचालयाची तत्काळ स्वच्छता करणे शक्य होईल. आगामी काळात सर्व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचमधील शौचालयांमध्ये स्मेल सेन्सर्स बसवले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याचा हा प्रयत्न आहे. या सेन्सर्सच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. यानंतर ते कोचमध्ये बसवण्यात आले. कोचच्या शौचालयातील दुर्गंधीची तीव्रता वाढताच सेन्सर्स हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर आपोआप संदेश पाठवेल. यापूर्वी प्रवाशांना स्वच्छतेच्या संदर्भात तक्रारी कराव्या लागत होत्या. आता हा त्रास वाचणार आहे.
शिवाय स्वच्छतेची कामेही गतिमान होतील. भविष्यात सर्व गाड्यातील शौचालयांमधील सेन्सर प्रणालीमुळे प्रवाशांची गैरसोय कमी करणे शक्य होईल. वंदे भारत एक्स्प्रेसमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात स्मेल सेन्सर इतर सर्व गाड्यांच्या शौचालयात बसवण्यात येणार आहेत.
कम्प्रेस पाइप ओरिएंटेशनमध्ये बदल –
वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या ड्रायव्हिंग ट्रेलर कोचच्या मुख्य जलमार्गिकेतून ते ऑटो ड्रेन व्हॉल्व्हपर्यंत कम्प्रेस पाइपचे दिशानिर्देश एका डीटीसी कोचमध्ये उलट बसवले आहेत. या धोरणात्मक बदलामुळे ऑटो ड्रेन व्हॉल्व्ह आणि कनेक्टिव्ह पाइपचे संरक्षण करता येणार आहे. हा बदल वंदे भारत एक्स्प्रेसमधील इतर डीटीसी कोचमध्ये वाढवला जाईल.