धबाबा तोय आदळ

समर्थांनी धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।। असं धबधब्याचं वर्णन केलं आहे. आम्ही आफ्रिकेतील व्हिक्‍टोरिया धबधबा पाहत असताना अगदी असाच अनुभव आला. झांबिया आणि झिंबाब्वे या देशांच्या सीमेवरून झांबेझी नदी वाहते. या नदीवरच हा सुप्रसिद्ध धबधबा आहे.

लुसाका इथं गेल्यावर आम्ही एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. या रिसॉर्टचं वैशिष्ट्य असं की त्याची बांधणी लाकडी होती आणि छप्पर चक्क गवताचं होतं. मात्र हे गवत खास प्रकारचं होतं. याला हत्ती गवत म्हणतात. हे खूप जाड आणि लांबलचक असतं. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात हे गवत मोठ्या प्रमाणावर आढळतं. या गवतात चालणारा हत्ती पूर्णपणे झाकला जातो. याच गवतापासून रिसॉर्टचं साधारणपणे एक फूट जाड छप्पर बनवलेलं होतं. मुसळधार पाऊस पडला तरी छपरातून एक थेंबही पाणी ठिबकणार नाही अशी त्याची रचना होती. गुजराती मालकांनी आमचं खूप छान स्वागत करून उत्कृष्ट भोजनही दिलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही व्हिक्‍टोरिया धबधबा पाहावयास निघालो. धबधब्यापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर आलो असतानाच त्याच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या. उतरून त्या दिशेनं पाहिलं असता आकाशामध्ये तुषारांपासून निर्माण झालेला ढग दृष्टीस पडला. धबधब्याच्या निकट आल्यावर तर काही वेळा बोललेलं ऐकू येत नव्हतं इतका धबधब्याचा जोरदार आवाज येत होता आणि अंगावर मधूनच तुषारांचा शिडकावा होत होता. “तुषार उठती रेणु’ या समर्थोक्तीची त्या वेळी आठवण झाली.

व्हिक्‍टोरिया धबधबा हा काही जगातील सर्वात उंचीचा किंवा रुंदीचा धबधबा नाही; परंतु पडणाऱ्या पाण्याचा पट्टा (उंची-रुंदी) लक्षात घेतला तर तो जगातला सर्वात मोठा धबधबा ठरतो. जगातला सर्वात उंच धबधबा व्हेनेझुएला येथील एंजल धबधबा आहे. त्याची उंची सुमारे 980 मीटर आहे म्हणजे व्हिक्‍टोरियाच्या नऊ पट जास्त आहे. सर्वात रुंद धबधबा लाओस आणि कांपुचिया यांच्या सीमेवरील खोने धबधबा आहे. तो तब्बल दहा किलोमीटर रुंद आहे. मात्र वर सांगितल्याप्रमाणे व्हिक्‍टोरिया धबधब्याचं स्वत:चं एक उच्च स्थान आहे.

बाह्य जगापासून अंधारात राहिलेल्या या धबधब्याला 1885 साली प्रथम प्रकाशात आणलं ते सुप्रसिद्ध भूसंशोधक डेव्हिड लिव्हिंग्स्टन यानं. धबधब्याजवळच असलेल्या झांबेझी नदीमधल्या एका बेटावरून त्यानं या स्वर्गीय दृश्‍याचा अनुभव घेतला आणि धबधब्याला आपल्या राणीचं-व्हिक्‍टोरियाचं-नाव बहाल केलं. लिव्हिंग्स्टनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या बेटाला लिव्हिंग्स्टन बेट असं नाव देण्यात आलं आहे. या महाप्रचंड प्रपातामुळे तुषारांचा मोठा मेघ तयार होत असल्यानं स्थानिक लोझी भाषेत त्याला मोसी ओए टोन्या म्हणजेच गर्जना करणारा धूर असं म्हणतात.

धबधब्याजवळचं झांबेझी नदीचं खोरं म्हणजेच झांबिया आणि झिंबाब्वे या देशांची सीमा. धबधब्याला लागून एक मोठा पूल आहे. पुलाच्या एका टोकाला झांबिया तर दुसऱ्या टोकाला झिंबाब्वे! आमच्याकडे झिंबाब्वेचा व्हिसा नसल्यानं आम्ही अधिकृतरीत्या पलीकडे जाऊ शकत नव्हतो; परंतु त्या टोकाला कोणतीही चौकी किंवा सुरक्षा व्यवस्था न दिसल्यानं आम्ही बिनदिक्कत झिंबाब्वेच्या प्रदेशात थोडं हिंडून आलो, पूल 1905 मध्ये बांधण्यात आला. सुरुवातीला तो लोहमार्गासाठी होता पण नंतर त्याला वाहनं आणि पादचाऱ्यांसाठीही जोड देण्यात आला. पुलावरून धबधब्याचं खरोखरीच रम्य दृश्‍य दिसतं. गरम असलेल्या वातावरणात तुषारांचा मधूनमधून होणारा थंड शिडकावाही आल्हादकारक असतो. पुलावरून सुमारे 200 मीटर खोलवर झांबेझी नदी वाहताना दिसते. पण एक स्वप्नवत दृश्‍य म्हणजे नदीच्या खोऱ्यात तुषारांवर उन्हाचा कवडसा पडल्यानं दिसणारं इंद्रधनुष्य. स्थितिस्थापक दोरीनं बांधून घेऊन पुलावरून उडी मारण्याच्या बंगी जंपिंग खेळाची सोयही तिथं आहे. बरेचसे युरोपिअन लोक त्याचा आनंद लुटत होते.

पुलावरून जसं धबधब्याचं मनोहारी दृश्‍य दिसतं तितकंच सुंदर दृश्‍य आकाशातून दिसतं. यासाठी जवळच मायक्रोलाइट विमान आणि हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे. मी हेलिकॉप्टरची निवड केली. माझी ही हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची पहिलीच वेळ होती. मायक्रोलाइट विमानांच्या उड्डाणासाठी छोटीशी धावपट्टी तिथं बनवण्यात आली आहे. अर्थात हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी अशी काही आवश्‍यकता नसते. मात्र एका गमतीशीर कारणासाठी आमचं उड्डाण लांबलं.

तिकिटं काढून आम्ही उड्डाणाच्या प्रतीक्षेत असताना हत्तींचा एक कळप धावपट्टी सावकाशपणे (गजगतीनं!) ओलांडत होता. त्यामुळे धावपट्टीचा वापर अर्थातच अशक्‍य होता. मग मी आमच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला हेलिकॉप्टर उड्डाणाला काय हरकत आहे असं विचारलं. त्यावर पायलटनं उत्तर दिलं की हत्तीच्या कळपाला हेलिकॉप्टरच्या आवाजानं त्रास होत असल्यानं तो कळप सुरक्षित अंतरावर गेल्याखेरीज हेलिकॉप्टर उड्डाणच काय पण कुठलीही मोठ्या आवाजाची कृती करता येत नाही. त्याला कायद्यानं बंदी आहे. मला आश्‍चर्य तर वाटलंच पण स्थानिक शासनाचं कौतुकही वाटलं. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर पायलटनं आम्हा सर्वांना-आम्ही 4-5 जण होतो-हेडफोन दिले. त्यातून तो आम्हाला सूचना करणार होता. हेलिकॉप्टरच्या मोठ्या आवाजामुळे सामान्य संभाषण अशक्‍य होऊन बसतं. त्यानं आम्हाला सर्व कोनांमधून धबधब्याचं दर्शन घडवलं. हा अनुभव फारच संस्मरणीय होता. एक-दोन वेळा हेलिकॉप्टरची जोरदार गिरकी घेऊन त्यानं आम्हाला भिववण्याचाही प्रयत्न केला. पण एकूण मजा आली. जगातील एक आश्‍चर्य जमिनीवरून तसंच आकाशातूनही पाहण्याचं भाग्य मला लाभलं.

स्मरणी
श्रीनिवास शारंगपाणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.