-अमित डोंगरे
आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात अनेक खेळाडू असे असतात की जे आपल्या खेळाने आपल्या देशालाच नव्हे तर खासगी संघालाही यशोशिखरावर घेऊन जातात. बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा देखील त्यांपैकीच एक.
मेस्सीने नुकतीच एक अशी कामगिरी केली की त्यामुळे त्याचा दर्जा ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यापेक्षाही जास्त उंचावला. युरोपमध्ये सातत्याने होत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये मेस्सीसह अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू सहभागी होत असतात. आपल्याकडच्या आयपीएलप्रमाणे तेथील विविध संघ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात खरेदी करतात व त्यांच्या जोरावर विविध स्पर्धा जिंकतात. अशाच एका मानाच्या समजल्या जात असलेल्या स्पॅनिश लीग स्पर्धेत मेस्सीने एक अनोखी कामगिरी केली. ही कामगिरीच अशी होती की त्यामुळे जागतिक फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट पेले यांच्याच कामगिरीशी त्याने बरोबरी केली. मेस्सीने पेले यांच्या 643 क्लब गोलची बरोबरी करत नवा अध्याय लिहिला.
क्लब फुटबॉल क्षेत्रात पेले यांच्या नावावर 643 गोल होते. ही कामगिरी अनेक वर्षे अबाधित होती. मेस्सीने वेलेंन्सियाविरुद्धच्या सामन्यात 643 वा गोल केला व पेलेंच्या कामगिरीची बरोबरी केली. या स्पर्धांच्या इतिहासात ऑस्ट्रियाच्या जोसेफ बिकेनने सर्वाधिक 805 गोल केले आहेत. अर्थात, मेस्सी जर आणखी पाच वर्षे खेळला तर तो हा विक्रम आपल्या नावावर जमा करेल असाही विश्वास वाटतो. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात व क्लब स्तरावर सर्वात जास्त गोल मेस्सीच्याच नावावर नोंदले जातील, असा विश्वास आहे. खुद्द पेले यांनी मेस्सीचे कौतुक केले आहे. आधुनिक फुटबॉल क्षेत्रात मेस्सी हा ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षाही जास्त दर्जेदार खेळाडू असल्याचे पेले यांनी सांगितल्यावर आता अन्य कोणाच्या प्रशस्तीपत्रकाची मेस्सीला गरज उरलेली नाही.
खरेतर मेस्सी व रोनाल्डो यांच्यात महान कोण, हा वाद गेली कित्येक वर्षे सुरू आहे. चाहते आपापल्या परीने याबाबत मत व्यक्त करतात. फुटबॉल जगतात सर्वाधिक लोकप्रिय असे हे दोन खेळाडू आहेत. या दोघांच्या चाहत्यांमध्ये कायम वाद होत असतात. पण आता खुद्द पेले यांनीच मेस्सीच्या कामगिरीचा गौरव केल्यामुळे या वादाला पूर्णविराम मिळाला, असे समजायला हरकत नाही. कोणत्याही दोन समकालीन खेळाडूंमध्ये तुलना होतच असते.
जागतिक क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर श्रेष्ठ की ब्रायन लारा, हा वाद जसा न संपणारा होता, तसाच मेस्सी की रोनाल्डो, हा वादही चाहत्यांच्या दृष्टीने न संपणाराच आहे. मात्र, जर मला माझा संघ निवडायला सांगितला गेला तर मी रोनाल्डोपेक्षा मेस्सीला जास्त पसंती देईन, असेही पेले यांनी मत व्यक्त केल्यामुळे निदान पुढील काही दिवस तरी मेस्सीचीच कॉलर ताठ राहणार आहे. खरेतर या दोघांची तसे पाहायला गेले तर तुलनाच होऊ शकत नाही. कारण मेस्सी हा स्ट्रायकर आहे, तर रोनाल्डो सेन्ट फॉरवर्ड खेळाडू आहे. या दोघांची खेळण्याची पद्धतही भिन्न आहे. मेस्सी आता 33 वर्षांचा आहे, तसे पाहायला गेले तर कदाचित तो आणखी किती काळ खेळेल हा प्रश्नच आहे. मात्र, जर तो आतासारखा फिट राहिला तर किमान पाच वर्षे तरी खेळेल. या कालावधीत त्याच्या नावावर क्लब स्तरावरच नव्हे तर जागतिक फुटबॉलमध्येही सर्वाधिक गोल जमा असतील.