दिवसभरात 683 बाधित; 9 जणांचा बळी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज शहरात नवीन 683 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरात रविवारी 651 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 32 जणांचे तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 16,283 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत शहरात 3726 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 299 रुग्णांचाही समावेश आहे.
शहरात आजपर्यंत 359 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 284 व शहराबाहेरील 75 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी दिवसभरात 9 रुग्णांचा करोनामुळे दुर्दैवी अंत झाला. त्यामध्ये शहरातील 8 तर शहराबाहेरील एका रुग्णाचा बळी गेला. शहरातील वाकड, वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड, चिखली मोरवाडी येथील आठ जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पाषाण येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 753 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 10,911 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3387 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 1197 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.