सोलापूर – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.
त्याच अनुषंगाने 1 फेब्रुवारी रोजी त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. एकूण 108 हरकत अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने होत्या. या सर्व अर्जांवर राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमक्ष सुनावणी झाली. त्यात 38 पैकी 7 प्रभाग रचनेत अंशतः बदल करण्यात आले आहेत. ही माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
एकूण 38 प्रभागापैकी 16 प्रभाग अनुसूचित जाती व 2 अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे पुढील आदेश येतील त्या प्रमाणे महापालिकेची यंत्रणा निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी सज्ज करण्यात येईल,. सद्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू झाले आहे. तर मतदार याद्यांच्या कामही पालिकेने हाती घेतले आहे.