औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये मंगळवारी सकाळी बिबट्या आढळला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारासा फिरायला गेलेल्या लोकांना बिबट्या दिसला आणि एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली. यानंतर या बिबट्याची शोधाशोध सुरू होती.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, तो हाती लागत नव्हता. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. भरवस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण होते.
काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात हा बिबट्या सकाळी दिसला होता. स्थानिकांनी त्याचे फोटोही कैद केले होते. स्थानिकांकडून तात्काळ पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली होती. वनविभाग त्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. दरम्यान हा बिबट्या एका घरातच लपून बसला.
हे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आपल्या हालचाली सुरु केल्या. अखेर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देत तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जेरबंद केले. त्यानंतर एका पिंजऱ्यातून वनविभागाचे कर्मचारी त्याला घेऊन गेले.