अकोले (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकर यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांची साथ सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे. त्यांच्यासहीत अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, काही संचालक व समर्थक मंगळवारी (दि.16) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होतील.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यांच्याबरोबर गायकर यांनीही राष्ट्रवादीला सोडले. परंतू विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड पराभूत झाले. दीड वर्षे उलटल्यानंतर गायकर यांनी पिचड पिता-पुत्रांची साथ सोडून पुन्हा एकदा हाती घड्याळ बांधण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील व इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्यासोबत अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, गुलाब शेवाळे, कचरू पाटील शेटे, अशोक देशमुख ,अशोक आरोटे, भास्कर बिन्नर, बाळासाहेब देशमुख, रामनाथ बापू वाकचौरे, सुधीर शेळके संचालक, रोहिदास भोर, आनंदा वाकचौरे, आप्पासाहेब आवारी हे गायकर समर्थक ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गायकर व स्थानिक इतर पदाधिकारी राष्ट्रवादीत जात असल्याने हा पिचड पिता-पुत्रांना मोठा धक्का मानला जात आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीतच गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. गायकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यावेळीच ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मध्यंतरी गायकर यांच्यावर एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. तर एकेकाळी सहकारी राहिलेले मधुकर पिचड यांच्याही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा समाचार घेतला आहे. गायकर यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेणे हे पिचडांचे वर्चस्व कमी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही अटीशिवाय ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. गायकर हे राष्ट्रवादीचेच होते. पुन्हा स्वगृही परतत आहेत. त्यांच्यासह अकोले तालुक्यातून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या सर्वच पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे स्वागत आहे.
राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.