पुणे – केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी (Laura Pigossi) हिने युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक 6-0, 3-6, 7-6(5) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी हिने युक्रेनच्या मारियाना झकारल्युकचा टायब्रेकमध्ये 6-0, 3-6, 7-6(5) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 2 तास 37 मिनिटे चालला. पहिला सेट अवघ्या 26 मिनिटात घेत लौराने मारियानावर निर्विवाद वर्चस्व राखले. या सेटमध्ये लौराने पहिल्याच गेमला मारियानाची सर्व्हिस रोखली. लौराच्या आक्रमक खेळी व बिनतोड सर्व्हिससमोर मारियानाची खेळी निष्प्रभ ठरली.
लौराने मारियानाची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या मारियानाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार कमबॅक केले. तिने लौराची दुसऱ्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. मारियानाने आपली आघाडी कायम ठेवत चौथ्या गेममध्ये लौराची पुन्हा सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मारियानाने सुरुवातीला वेगवान खेळ केला.
मारियानाने पहिल्या, तिसऱ्या सेटमध्ये लौराची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर लौराने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत आठव्या व दहाव्या गेममध्ये मारियानाची सर्व्हिस रोखलीव सामन्यात 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये लौराने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व हा सेट 7-6(5) असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. कारकीर्दीत प्रथमच 25 पारितोषिक स्पर्धा जिंकली आहे.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला 3935 डॉलर (2,86,000रुपये) आणि 50 डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 2107 डॉलर (1,54,000 रुपये) व 30 डब्लूटीए गुण देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि एमएसएलटीएचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
एकेरी – अंतिम फेरी – महिला -लौरा पिगोस्सी (ब्राझील) (3) वि. वि. मारियाना झकारल्युक (युक्रेन) (5) 6-0, 3-6, 7-6(5).