नवी दिल्ली – ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने केवळ एक डोस पुरेसा असलेल्या स्पुटनीक लाइट या करोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तज्ज्ञांच्या समितीने या लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्याबाबत शिफारस केली होती. त्याला अनुसरून डीसीजीआयने मंजुरी दिली आहे.
भारतात वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी स्पुटनिक लाइट ही एकमेव सिंगल डोस असणारी लस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी रविवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. या लसीच्या वापरामुळे करोना महामारीविरोधातील सामूहिक लढ्याला आणखी बळकटी मिळेल, असे ट्विट मांडविय यांनी केले आहे.
देशात करोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाची भिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. स्पुटनिक लाइट ही रशियाने विकसित केलेली दुसरी करोना प्रतिबंधक लस आहे. या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागेल.
एकच डोस संसर्गावर अत्यंत प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लस तब्बल 93 .5 टक्के प्रभावी आहे. केवळ एक डोस एवढा प्रभावी असल्यामुळे दुसऱ्या डोसची गरज भासत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही लस बूस्टर डोस म्हणूनदेखील खूप प्रभावी आहे. या लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉनविरुद्ध 100% प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.