मेक्सिको – येथील एका महिलेला अंधश्रद्धेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पेर्ला एन असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. पेर्ला यांच्या अंगात भूत येत असल्याचा तिच्या घरच्यांना संशय होता. त्यामुळे तिच्यावर काही अघोरी उपाय करण्यात येत होते. त्यात यश येत नाही अशी धारणा झाल्याने पेर्लाच्या कुटुंबाने एक प्राचीन मानला जाणारा उपाय करायचं ठरवलं आणि त्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.
या अघोरी उपायाला टोड थेरपी म्हटले जाते. टोड म्हणजे बेडुक. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये हा उपाय करून लोकांवर उपचार केल्याचा दावा केला जातो. या उपायात विषारी बेडकांचा वापर करण्यात येतो. पेर्ला हिला तिचे कुटुंबीय अशाच उपाय करणाऱ्या थेरपिस्टकडे घेऊन गेले. तिला पेरुवियन बेडकाच्या विषाचा धूर दिला. हा धूर घेतल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले.
धुराच्या रुपाने तिच्या अंगात विष भिनल्याने काही वेळाने तिचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अशा प्रकारे उपाचार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पॉर्न स्टार नाको विडल हिने जोश लुईस नावाच्या फॅशन फोटोग्राफरला असंच कोलोराडो नदीत सापडणाऱ्या बेडकाचं विष दिलं होतं. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.