नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन ओवैसी यांनी त्यांना केंद्र सरकारने दिलेली झेड सुरक्षा स्वीकारावी अशी सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
त्यांनी आज संसदेत याविषयी निवेदन करताना सांगितले की ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यात त्यांना केंद्र सरकारकडून बुलेटप्रुफ गाडीही दिली जाणार होती. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ती आवश्यक आहे. पण त्यांनी झेड सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला आहे, ही सुरक्षा त्यांनी स्वीकारली पाहिजे, अशी विनंती मी या सभागृहाच्या माध्यमातून ओवैसी यांना करीत आहे, असे निवेदन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
या हल्ला प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तुलेही हस्तगत करण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.