Singer Mallika Rajput Death| म्यूजिक इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गायिका विजय लक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत हिचा सुलतानपूर (उत्तर प्रदेश) येथील राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी मल्लिका राजपूतचा मृतदेह तिच्या घराच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मल्लिकाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मल्लिका राजपूतची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की, ‘आम्ही झोपलेलो होतो. मल्लिकाच्या खोलीचा दरवाजा बंद होता. आम्ही दरवाजा वाजवला पण दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिले तर ती उभी असल्याचे दिसले. आम्ही दार तोडले तेव्हा मल्लिका लटकलेली लटकलेल्या अवस्थेत दिसली. दरम्यान मल्लिका राजपूतचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच स्पष्ट होईल.
कोण होती मल्लिका राजपूत?
35 वर्षांची मल्लिका राजपूत गायिका आणि अभिनेत्री होती. 2014 मध्ये रिलीज झालेल्या कंगना राणौतच्या ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात तिने काम केले होते. या क्राईम कॉमेडी चित्रपटात मल्लिकाने सहाय्यक भूमिका साकारली होती. याशिवाय ती गायक शानच्या ‘यारा तुझे’ गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती. मल्लिका राजपूतने 2016 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, दोन वर्षांनी ति राजकारणापासून दूर झाली होती.
चित्रपट आणि राजकीय कारकीर्द फ्लॉप झाल्यानंतर मल्लिका राजपूत अध्यात्माच्या मार्गावर निघाली होती. 2022 मध्ये, तिची उत्तर प्रदेशच्या भारतीय सवर्ण संघाच्या राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाली होती. मल्लिका एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील होती. पुढे तिने स्वत:ही गझल लिहायला सुरुवात केली, वेगवेगळ्या कविसंमेलनात ती गझल सादर करत असे.
रिपोर्ट्सनुसार, मल्लिका राजपूत स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवते. चार वर्षांपूर्वी तिचा विवाह प्रदीप शिंदे नावाच्या व्यक्तीशी झाला होता. गायिकेच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचेही बोलले जात आहे. मल्लिका राजपूतच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. संगीत क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.