सिंगापूर – सिंगापूरचे पंतप्रधान ली हसिएन लोंग हे येत्या १५ मे रोजी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत. देशाचे उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवली जाणार असल्याचेही हसिएन लोंग यांनी आज जाहीर केले. पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये पंतप्रधान पद हस्तांतरण करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
ली यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रीया कोणत्याही देशासाठी महत्वाची असते, असे त्यांनी म्हटले आहे. आपण १५ मे रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे सोडणार असून उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग हे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याचे ली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, विशेषतः करोनाच्या साथीमध्ये लॉरेन्स आणि ४ जी टीमने खूप कष्ट घेतले आहेत. फॉरवर्ड सिंगापूर उपक्रमांतर्गत त्यांनी देशाच्या राष्ट्रीय अजेंड्यासाठी आणि नवीन पिढीसाठी खूप काम केले आहे, असेही ली यांनी नमूद केले आहे. सिंगापूरचे तिसरे पंतप्रधान म्हणून आणि सत्तारुढ पीपल्स ऍक्शन पार्टीचे सरचिटणीस म्हणू ली २००४ पासून कार्यरत आहेत.