वॉशिंग्टन – करोना महामारीच्या कालावधीमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असली तरी या महामारीच्या कालावधीमध्ये वास्तव्य करण्यासाठी सर्वात उत्तम देश म्हणून सिंगापूरची निवड करण्यात आली असून न्यूझीलंड दुसर्या स्थानावर आहे.
ब्लूमबर्ग या प्रख्यात संस्थेने या संदर्भातील रँकिंग जाहीर केली असून यावेळी सिंगापूरने न्यूझीलंडचे पहिले स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी न्युझीलँड पहिल्या क्रमांकावर होता तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर होता.
सिंगापूरमध्ये करोना महामेरीच्या कालावधीमध्ये लसीकरणाची मोहीम अत्यंत तीव्रपणे आणि गांभीर्याने राबविण्यात आली असल्याने त्यांना हे पहिले स्थान प्राप्त झाले आहे. तिकडे न्यूझीलंडमध्ये मात्र लसीकरणाची गती अत्यंत कमी आहे. सिंगापूरमध्ये या महामारीच्या कालावधीत अनेक बंधने लागू असून येण्याजाण्यावर ही बंधने आहेत. बाहेरून देशात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची अत्यंत कठोरपणे तपासणी केली जाते.
कामाच्या निमित्ताने सिंगापूरमध्ये प्रवेश करणाऱ्यांनाही अत्यंत कठोर चाचणीला सामोरे जावे लागते. संपूर्ण सिंगापूरमध्ये संक्रमणाची पातळी शून्य आहे. नागरिकांना दैनंदिन व्यवहार करायला परवानगी असली तरी त्यांना संपूर्ण नियमांचे पालन करावे लागते.
साठ लाख लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये पंधरा टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्यात आले आहे. राहण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान २० वरून ३० पर्यंत कमी झाले आहे. भारतातील करोनाचे वाढते संक्रमण लसीकरणाचा कमी वेग यामुळेच भारताचे स्थान घसरले असल्याची माहिती समोर येत आहे.