मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सदावर्तेंची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण मिळालं असून सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांचं नाव समोर आलं आहे.
जयश्री पाटील यांनीच हे आंदोलन करण्यास सांगितले, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघड झाली आहे. त्याआधारेच कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याचं समोर आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्नी अॅड. जयश्री पाटील यासुद्धा अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी आता त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
7 एप्रिल रात्री 11 ते 8 एप्रिल पहाटे 2 वाजून 50 मिनिटे या कालावधीत गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील , जयश्री पाटील आणि कोअर कमिटीतील इतर लोकांची सदावर्ते राहत असलेल्या क्रीस्टील टॉवरच्या टेरेसवर मीटिंग झाली. याच मीटिंगमध्ये जयश्री पाटील यांनी पवारांच्या घरावर आंदोलन करण्यास सांगितले, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.