मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. चार दिवस पोलीस कोठडीत काढल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वकिलांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण होते. या हल्ल्यात सदावर्तेंचा हात असल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट करत 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हान दिलं होतं.