न्यूयाॅर्क – खलिस्तानींबाबतचा वाद सातत्याने वाढत आहे. कधी कॅनडात तर कधी अमेरिकेत या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या सतत येत असतात. मात्र, आता भारतीय वंशाच्या एका प्रमुख अमेरिकन शीख नेत्याने स्पष्ट केले आहे की, येथील सरकार किंवा समुदाय खलिस्तान चळवळीला पाठिंबा देत नाही.
शीख ऑफ अमेरिका संघटनेचे जस्सी सिंग यांनी म्हटले आहे की, शिख समुदाय खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देत नाही. भारत सरकारने पंजाबमधील तरुणांमधील वाढत्या ड्रग्सच्या समस्येसह अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी विकास पॅकेज देण्याची गरज आहे. या सर्व समस्यांमधून राज्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
सिंग म्हणाले, मोदी सरकारचे शीखांशी असलेले संबंध आणि त्यांनी समाजासाठी जे काही केले ते मागील सरकारच्या तुलनेत प्रशंसनीय आहे. त्यात कोणताही संशय नाही. मात्र, अजूनही शिखांचे अनेक प्रश्न आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यात १९८४ च्या दंगलीतील शीखांवर झालेल्या अत्याचाराचाही समावेश आहे. कोणताही शीख हे विसरणार नाही.
मोदी सरकारने शिखांच्या चिंतेचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, परंतु अजूनही अनेक मुद्दे आहेत ज्याकडे त्यांचे लक्ष देणे आवश्यक आहे. पंतप्रधानांना अकाली आणि बादल यांच्यासारख्या दलालांची गरज नाही. त्यांनी भारत आणि जगातील शीख समुदायाशी थेट संबंध निर्माण करणे आवश्यक आहे.
जस्सी सिंग आणि त्यांच्या शिष्टमंडळाने २०१४ पासून अमेरिकेच्या प्रत्येक भेटीत पंतप्रधानांची भेट घेतली आहे. सिंग म्हणाले की, भारताच्या विकासाची कहाणी प्रत्येक अनिवासी भारतीयाला अभिमानास्पद वाटते आणि आता केंद्राने पंजाब राज्य, तेथील तरुण आणि तेथील लोकांसाठी काही चांगले पॅकेज देण्याची वेळ आली आहे.