Khalistani in Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पूर्णपणे ताणले गेले आहेत. त्यातच आता निज्जरच्या हत्येनंतर त्याच्या साथीदारावर निशाणा साधला जात असल्याचे समोर आले आहे. कारण निज्जरच्या साथीदाराच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. निज्जर यांच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद निर्माण झालेल्या वेळी हा हल्ला झाला. खलिस्तानी दहशतवादी निज्जरची गेल्या वर्षी १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
कॅनडातील माध्यमांनुसार, ज्या घरात गोळ्या झाडल्या गेल्या ते घर सिमरनजीत सिंग यांचे आहे. कॅनडाच्या वेळेनुसार गुरुवारी पहाटे हा हल्ला झाला. घर आणि घराबाहेर पार्क केलेल्या कारवर गोळ्यांच्या खुणा असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) च्या सरे शहर पोलिसांनी सांगितले की, शहराच्या दक्षिणेकडील भागात एका घरावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.
सरे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात,” ही घटना 1 फेब्रुवारी मध्यरात्री 1.21 वाजता त्यांना एका घरावर गोळीबार झाल्याची बातमी मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांना घरावर गोळ्यांच्या खुणा सापडल्या आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुरावे गोळा केले. पोलिसांचा गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. या हल्ल्यामागे नेमके कारण काय होते, हे शोधण्याचा अधिकारी प्रयत्न करत असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, या हल्ल्यानंतर खलिस्तानी गटांनी भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. सिमरनजीत सिंग हा तोच व्यक्ती आहे ज्याने २६ जानेवारीला व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने केली होती.