चंदीगड – पंजाब काँग्रेसमध्ये सध्या पक्षांतर्गत कलह माजला आहे. पक्ष नेतृत्वाने अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला असला तरी मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या सिद्धू यांचा हिरमोड झाला आहे. पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करत काँग्रेसने सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे दुखावलेल्या सिद्धू यांनी काही महिन्यांपूर्वीच मिळालेल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
सिद्धू यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून काँग्रेसकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री चन्नी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत सिद्धू पंजाब भवन येथे दाखल झाले आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर मुख्यमंत्री चन्नी यांनी चर्चेसाठी पाचारण केले असल्याची माहिती दिली होती.
सिद्धू यांनी ट्विटर खात्यावर, “मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. यासाठी आज दुपारी ३ वाजता पंजाब भवन येथे पोहचणार आहे.” अशी माहिती दिली.
तत्पूर्वी, २८ सप्टेंबरला सिद्धू यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्षपदाची राजीनामा देत असल्याचे कळवले. राजीनाम्यासाठी आपण तडजोड करू शकत नाही असं कारण त्यांनी या पत्रामध्ये दिल होत.
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेल्यांमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याचा देखील समावेश आहे.
मुख्यमंत्री चन्नी व सिद्धू यांच्यातील आजच्या भेटीनंतर सिद्धू आपला राजीनामा मागे घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.