गणेशभक्‍तीची “डोळस” अनुभूती…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांसमोर दृष्टीहीन लहानग्यांची गणेशवंदना

पुणे –  गणरायाचे सगुण, साकार…आणि सर्वांगसुंदर रूप त्यांनी पाहिले नाही… मात्र, गणेशभक्‍तीची “डोळस’ अनुभूती त्यांच्या स्वरांनी येत होती….या दृष्टीहीन मुलांच्या आर्त स्वरांनी मंडळाचा परिसरही भारावून गेला. निमित्त होते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अनोख्या गणेशवंदना कार्यक्रमाचे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपात शुक्रवारी सायंकाळी अथर्वशीर्षाचे पठण झाले. “रिदम डान्स अकॅडमी’ आणि “जो किड्‌स क्‍लब’च्या वतीने अथर्वशीर्ष पठण झाले. यामध्ये सुमारे 20 दृष्टीहीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अभिनेते ओंकार भोजने, निखिल बने, दत्तात्रय मोरे, ऍकॅडमीच्या ज्योती गुजर, सायली गुजर यांसह विद्यार्थ्यांचे पालक आणि मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अथर्वशीर्ष पठणाने या सत्राची सुरुवात झाली. तर “जय गणेश माहिमा’, “एकदंताय वक्रतुंडाय’, “ओमकार प्रधान’, “तुज मागतो मी आता’ ही गीते सादर करत विद्यार्थ्यांनी “श्रीं’चरणी सेवा अर्पण केली. यावेळी मुलांच्या सादरीकरणाने भाविक आणि मंडळाचे कार्यकर्तेदेखील भारावून गेले होते. यानंतर कलाकार आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली.

रिदम डान्स अकॅडमी आणि जो किड्‌स क्‍लब दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करते. दरवर्षी गणेशोत्सवात आपण विद्यार्थी, महिला आदींचे अथर्वशीर्ष पठण पाहतो. शुक्रवारी नेत्रहीन विद्यार्थ्यांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांसमोर अथर्वशीर्षाचे पठण करण्याची संधी मिळाली आहे.
– सायली गुजर,
रिदम डान्स अकॅडमी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.