तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर ढोल वाजवायला सुरुवात करताच थकबाकीदारांकडून लाखो रूपयांची वसुली होऊ लागली आहे. तर या वसुली प्रकाराचा अनेकांनी धसका घेतला असून शहरभर ही वसुली चर्चेचा विषय झाला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कडक उपाययोजना करणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यातच केली होती. त्यानुसार सोमवारी पहिल्या सत्रात उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचारी, करवसुली अधिकारी व काही खाते प्रमुखांचे विशेष पथक मोठी थकबाकी असलेल्या मिळकतदारांच्या घरासमोर दाखल होऊन ढोल वाजवायला सुरुवात केली.
तसेच वसुली पथकांनी दारासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे थकबाकीदाराची एकच धांदल उडाली. काहीनी घाबरून घरात असलेल्या शिल्लकेतून रोख, तर काहीनी धनादेश देऊन वेळ निभावून नेली. ततर, दुपारच्या सत्रात कर अधिकारी कल्याणी लाडे यांचे नेतृत्वाखालील करवसुली पथकाने मोठी थकबाकी असलेल्या करदात्यांचे घरांसमोर ढोलाचा गजर सुरू करताच मालमत्ताधारकाची तारांबळ उडाली.
त्यांनीही आपली थकबाकी काहिंनी रोख तर काहीनी धनादेश देऊन वेळ मारून नेली. या कठोर उपाययोजनेचे स्वागत व वसुली पथकांनचे आभार मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी मानले. अशाच कठोर उपाययोजना करुन शंभर टक्के वसुली करणार असल्याचे एन. के. पाटील यांनी जाहीर केले आहे.
दोन पथकांकडून धडक मोहीम
तळेगाव शहरातील कर थकबाकीदार मालमत्ता धारकामुळे अतिशय अल्प वसुली झालेली आहे. तर शेवटच्या महिन्यात नगरपरिषदेला सुमारे २० कोटी रूपयांची करपट्टी वसुल करावयाची असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. वसुलीबाबत वेळोवेळी सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, रोजच अल्प वसुली होत होती. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी थकबाकीदारासाठी कठोर उपाययोजना अमलात आणली.
गेल्या आठवड्या त्यांनी कर संकलन विभागाकडून वसुली बाबतचा आढावा घेतला व कठोर उपाययोजना अमलात आणणार असे सांगितले. करसंकलन विभागाच्या नित्याच्या कर्मचारी वर्गाबरोबरच नगरपरिषदेच्या इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व सेवक यांचा समवेश असलेली विशेष दोन वसुली पथके तयार करून सोमवारपासून धडक मोहीमेस सुरवात केली आहे.
थकबाकीदारांचे नळजोड तोडणार
पाणी पट्टी थकबाकीदार असलेल्यांचे नळजोड तोडण्यात येणार आहेत. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी वसुलीसाठी वापरलेली ही पद्धत तळेगावातील मालमत्ताधारकांसाठी अनोखी असल्याने त्याची चर्चा होत आहे.