जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व ठप्प झाले आहे. यामुळे लोकांचे बाहेर पडणेही बंद झाले आहे. देशातही लॉकडाऊन सुरू असून काही गोष्टींवर निर्बंध लागू आहेत. यामुळे नागरिक अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच बाहेर पडत आहेत. सद्यपरिस्थितीत घराबाहेर पडणे एखाद्या साहसापेक्षा कमी नाही आणि श्रद्धा कपूरने असेच साहस करून आपल्या भावासोबत बाहेर पडली आहे.
श्रद्धा कपूर ही आपला भाऊ सिद्धांत कपूरसोबत ग्रोसरी शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेली होती. या शॉपिंगचे वर्णन तिने “एडव्हेंचर’ असे केले आहे. भावासोबत फोटो शेअर करताना श्रद्धाने लिहिले की, “ग्रोसरीज एडव्हेंचर विद भैय्या सिद्धांत कपूर.’ या फोटोमध्ये श्रद्धा आणि सिद्धांत हे दोघेजण मास्क आणि ग्लोव्ह्ज घालून उभे असलेले दिसतात.
सध्या श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबासह घरी आहे. लॉकडाऊनदरम्यान तिने प्राण्यांच्या हितासाठी आवाज उठविला होता. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर प्राणिसंग्रहालय बंद करण्याची मागणी केली होती. याशिवाय ती स्वतःचा आणि कुटुंबीयांचे जुने फोटो शेअर करत आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.
दरम्यान, श्रद्धा अखेरच्या वेळी “बागी 3’मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यात श्रद्धासोबत टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका साकारली होती.