नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यातून सावरत असलेले भारतीय क्रीडा क्षेत्र आता पुढील मोसमासाठी सज्ज होण्यासाठी तयारी करत आहे. याचाच भाग म्हणून येत्या 10 जूनपासून अखिल भारतीय मुष्टियुद्ध महासंघ प्रशिक्षण व सराव शिबिर आयोजित करणार आहे.
पतियाळातील सराव केंद्रात हे शिबिर आयोजित केले जाणार असून खेळाडूंना काही नियमांचे बंधन पाळून यात सहभागी होता येणार आहे. करोनामुळे जागतिक क्रीडा क्षेत्राला खूप मोठा फटका बसलेला असून येत्या काळात जर हा धोका संपुष्टात आला तर स्पर्धादेखील आयोजित करता येणार आहेत. लॉकडाऊन असतानाही सरकारने देशातील जे भाग रेड झोनमध्ये नाहीत तिथे क्रीडा संकुले तसेच मैदाने सराव व प्रशिक्षणासाठी सुरु करण्याची परवानगी दिली असल्याने महासंघाने हे शिबिर सुरु करण्याचे निश्चित केले आहे.
टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या किंवा आगामी पात्रता स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या खेळाडूंना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. रविवारी महासंघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून हा निर्णय घेतला आहे.
टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत 9 मुष्टियोद्धे पात्र ठरलेले आहेत. त्यात अमित पांघल, मनिष कौशिक, विकास क्रिशन, आशिष कुमार, सतीश कुमार हे पुरुष गटात तर, एम. सी. मेरी कोम, सिमरनजीत कौर, लवलिना बोर्गोहेन आणि पूजा राणी महिला गटात पात्र ठरलेल्या आहेत.