पुणे – सध्या करोनामुळे प्रत्येक ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे. मॉल आणि सुपरमार्केटसारख्या ठिकाणी एकाच वस्तूला अनेकांनी हात लावलेला असतो. या वस्तूंपैकी सगळ्यात जास्त हात लावला जातो तो शॉपिंग बास्केटला. त्यामुळे इतरांनी हाताळलेली शॉपिंग बास्केट तुम्हीही हाताळता तेव्हा त्यावरील जीवजंतू हाताला तसेच तुम्ही ज्या ज्या वस्तूला हात लावतात तेथे पसरतात. शॉपिंग बॉस्केटमध्ये टाकलेल्या वस्तू घरी आणतात तेव्हा या वस्तूंसोबत जीवजंतूही घरात प्रवेश करतात.
मॉल आणि सुपरमार्केटचं जाळं आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. घरातील किराणापासून कपड्यांपर्यंत काहीही खरेदी करायचे असल्यास लोक हल्ली मॉल किंवा सुपरमार्केट गाठतात. त्यामुळे येथे कायमच गर्दी असते आणि गर्दी असलेल्या ठिकाणी करोना संसर्गाची जास्त भीती असते.
अमेरिकेतील एरिजोना विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट चार्ल्स गर्बा यांनी याबाबत संशोधन केले आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, सुपरमार्केटमधील बास्केट अत्यंत अस्वच्छ असतात. याशिवाय, शॉपिंग कार्ट हॅंडल्सवरही जंतू असतात. शिवाय, हे जंतू आरोग्याला अत्यंत हानिकारक ठरू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.