नेमबाजी : ऑलिम्पिक पात्रतेसाठीचे नवे निकष पथ्यावर

नेमबाज अनिष भानवालाला पात्रतेची संधी

नवी दिल्ली – भारतीय नेमबाज खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) या खेळाबाबत काही नवे आयाम निश्‍चित केले असून एक वर्ष पुढे गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची आणखी एक संधी नेमबाजांना मिळाली आहे. त्यातही भारताचा नवोदित नेमबाज अनिष भानवाला याला त्याचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

महासंघाने नव्याने तयार केलेले निकष आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) देखील मान्य केले आहेत. सध्या भारतीय नेमबाजी संघटना यावर काय प्रतिसाद देते ते महत्त्वाचे ठरणार असले तरीही त्यांना हे निकष मान्य करावेच लागणार आहेत. या

स्पर्धेला आतापर्यंत 15 भारतीय नेमबाज पात्र ठरले असून आता येत्या काळात होत असलेल्या पात्रता स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करून अनिषसह विजयकुमारला देखील पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. विजयकुमारने 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रजतपदक पटकावले होते त्यामुळे यंदाही त्याच्या पात्रतेच्या आशा वाढल्या आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासात यंदा प्रथमच भारताचे 15 खेळाडू पात्र ठरले असून त्यात अनिषची देखील भर पडू शकते.

महासंघाने तयार केलेल्या नव्या निकषांनुसार येत्या काळातील पात्रता स्पर्धांमध्ये वाढ होणार आहे. तसेच त्यातील गुणांकन पद्धत जास्त सोपी करण्यात आलेली आहे. गटवारीबाबत बोलायचे झाले तर रायफल, पिस्तूल प्रकारात यंदाच्या स्पर्धांमध्येही खेळाडूंनी अव्वल गुणांची कमाई केली तर ते पात्र ठरू शकतील. यंदा सप्टेंबरपासून पात्रता स्पर्धा सुरू होण्याचे संकेत महासंघाने दिले आहेत. सांघिक आणि वैयक्‍तिक गटातदेखील पुढील काळात किमान चार स्पर्धा आयोजित करण्याची सध्या महासंघाकडून चाचपणी सुरू आहे. त्यात विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाचेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. या स्पर्धेला पात्र होण्याची संधी देताना वैयक्‍तिक गटात अद्याप 12 खेळाडूंना पात्र होता येणार आहे. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल गटात भारताचा नवोदित नेमबाज अनिषला या नव्या पात्रता निकषांचा लाभ मिळणार आहे. मार्च महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत अनिष पहिल्या दहा खेळाडूंमध्ये होता.

टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी अनिषसह विजयकुमारला पुढील वर्षी होत असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत गुणांमध्ये वाढ करावी लागेल. करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले गेल्याने ही संधी खेळाडूंना मिळालेली आहे.

नेमबाज वर्चस्व राखतील – नारंग

2004 सालापासून भारतीय नेमबाजांनी प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. आता टोकियो स्पर्धा पुढे गेल्याने खेळाडूंना सरावासाठी मिळालेला अतिरिक्‍त वेळ लाभदायक ठरणार असून पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज वर्चस्व राखतील, असा विश्‍वास भारताचा ऑलिम्पिकपटू नेमबाज गगन नारंग याने व्यक्‍त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.