वाई पालिकेचा आरोग्य विभाग पुरस्काराने सन्मानित 

वाई -करोनाचा प्रादुर्भाव वाई शहरात होऊ नये, म्हणून वाई पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची दखल घेऊन वाई रोटरी क्‍लबच्यावतीने या विभागाला व्यवसाय सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रत्येक प्रभागात जंतुनाशकाची फवारणी, दररोज रस्ते व सावर्जनिक ठिकाणांची साफसफाई, घंटागाड्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, इन्स्टिटयुशनल क्वारंटाइन सेंटरमधील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे, बाहेरून आलेल्या व्यक्तीना क्वारंटाइन करणे, त्यांची माहिती घेऊन 14 दिवस फॉलोअप ठेवणे, क्वारंटाइन सेंटरमध्ये निर्जंतुकीकरण करणे, करोनाग्रस्त रुग्ण अथवा संशयिताचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतदेहावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना व थुंकणाऱ्यांना दंड करणे, आदी उपाययोजना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सचोटीने केल्याने वाई शहरात करोनाचा प्रसार फारसा झालेला नाही.

या कार्याची दखल घेऊन रोटरी क्‍लब ऑफ वाईचे अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर, स्वाती हेरकळ, डॉ. मनोहर दातार व सदस्यांच्या हस्ते आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यवसाय सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नगराध्यक्ष डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, आरोग्य समितीच्या सभापती सौ. रुपाली वनारसे, माजी सभापती चरण गायकवाड, नगरसेवक सतीश वैराट, मुख्याधिकारी विद्या पोळ, कार्यालय निरीक्षक नारायण गोसावी, आरोग्य निरीक्षक गुणवंत खोपडे, योगेश गाडे, मुकादम उमेश कांबळे, राहुल गाडे, रवींद्र कोळोखे व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.