गॅरी (युएस) – शिकागोतील एका भारतीय नाईटक्लबमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
शिकागोमधील गॅरी येथे रात्री 2 वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन व्यक्ती जखमी झाले होते. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका 34 वर्षीय व्यक्तीवर नाईटक्लबच्या गेटवर आणि 26 वर्षीय तरुणीवर क्लबच्या आतमध्ये गोळीबार करण्यात आला. या दोघांनाही तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या गोळीबारात अन्य चौघे जखमी झाले असून यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, प्रशासनाने अद्याप पीडितांची कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच गोळीबाराचे नेमकं कारण काय याबद्दलही सांगण्यात आलेले नाही. या ठिकाणी जास्त गर्दी असल्याने ती कमी करण्यासाठी अनेक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.