देहूगाव – संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.13) देहू येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर देहूत कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. स्वच्छता व सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे. सर्व आवश्यक कामे झाल्यामुळे देहूचे रूपडे पालटले आहे. तर मोदी ज्याठिकाणी भेट देणार आहेत, त्याठिकाणी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देहूत येत आहेत. यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्याबरोबरच भागवत धर्माची पताका देखील फडकविणार आहेत. दुपारी हेलिकॉप्टरने आल्यानंतर झेंडे मळा येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्याकरिता तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने 14 कमानीजवळ पोचतील. कमानीजवळ मोटारीतून पायी मंदिराजवळ पोहचतील.
चारशे वारकऱ्यांसमवेत या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे बावीस एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाच्या चारही बाजूंनी पत्रे लावून बंद केला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवी कडे दोन लहान मंडप टाकण्यात आले आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थान व नगर पंचायत यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची तयारी जय्यत करण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे वॉर्निश पॉलिश काम ओवऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. देहू नगरपंचायतीने रस्त्याची साफसफाई, विजेचे खांब व गटार दुरुस्ती केली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या भरून बुलडोझर फिरवून दाबून घेण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणाहून हेलिपॅडपर्यंत डांबरी रस्ता बनविण्यात आला आहे. मंडपामध्ये 40 हजार नागरिकांची बसण्याची सोय आहे. भाविकांना पंतप्रधान मोदी स्पष्ट दिसावेत यासाठी याठिकाणी एलइडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
सभा स्थानी जाण्याया मार्ग
* आळंदी रस्ता व तळेगाव- चाकण रस्ता येथून येणाऱ्या भाविकांनी विठ्ठलवाडीपर्यंत यावे. तेथून जुन्या पालखी मार्गाचा वापर करावा.
* देहूरोड-देहू रस्त्याने सरळ सभास्थानी जाता येईल.
* सभा स्थानापासून दीड किलोमीटरवर वाहनांची पार्किंगची व्यवस्था असेल.
* देहूगावातील भाविक जुन्या पालखी मार्गाने सभास्थानी येतील.
रस्ते वाहतुकीसाठी बंद-
* पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमान पासून देहू गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
* निगडीतील भक्ती शक्ती चौक- तळवडे- कॅनबे चौकापर्यंत पर्यायी रस्ता.
* तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा ते परंडवाल चौक व्हीआयपी वाहनं शिवाय इतर वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहील.
* देहू कमान ते 14 टाळकरी कमान पर्यंत रस्ता बंद राहील.
* साईराज चौक- सांगुर्डी फाटा- परंडवाल चौक- भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद.
येताना हे टाळावे-
* सर्व भाविकांनी पांढऱ्याशुभ्र पोषाखात येणे अपेक्षित आहे.
* काळा बूट, चप्पल, सॉक्स, बनियन रुमाल शक्यतो टाळावे.
* सभा स्थानावर दोन तासापेक्षा अधिक वेळ बसावे लागेल तशा तयारीने यावे.
* दुपारी बाराच्या नंतर कोणालाही गेट मधून सोडले जाणार नाही.