रिफेक्टरीप्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनालयातील (रिफेक्टरी) जेवणासंबंधी नव्या नियमांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी दोन विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील पाण्याच्या टाकीवर चढून “शोले’ चित्रपटातील स्टाइलने आंदोलन केले.
दरम्यान, विद्यापीठाकडून गुन्हे मागे घेण्याची ग्वाही दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी अनेकदा विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांकडूनच मागणी करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाने काहीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे शनिवारी नंदकुमार हांगे व कृणाल सपकाळ यांनी सकाळी 11.30 वा. जयकर ग्रंथालयाजवळील पाणी टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी सुरक्षा रक्षक, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, ऍम्बुलन्सही दाखल झाली. विद्यार्थ्यांचाही जमाव झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दुपारी 3.30 वा. विद्यापीठाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
तक्रारकर्त्यानेच दिला लेखी जबाब
गुन्हे मागे घेण्याबाबत विद्यार्थ्यांनी तोंडी व लेखी अर्जाद्वारे विनंतीही केली. याबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सुरेश भोसले यांनी दालनात बोलावून चर्चा केली होती. त्यानुसार गुन्हे मागे घेण्याची ग्वाही देत असल्याचा लेखी जबाब तक्रारदार भुरसिंग राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक सी.पी.गुजर यांच्यासमक्ष लिहून दिला आहे. मात्र, त्यावर लगेच गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
प्रकरण काय?
मासिक सदस्य नसलेल्या विद्यार्थ्यांना र्रिफेक्टरीतील भोजनाची व्यवस्था बंद करण्यासह इतर विविध नवीन नियमांचे परिपत्रक काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी विद्यापीठाकडून 1 एप्रिल 2019 पासून सुरू करण्यात आली होती. याविरुद्ध विद्यार्थी व संघटनांनी याला विरोध करत आंदोलन केले होते. यावेळी सुरक्षा रक्षकांना धुक्काबुक्कीही झाली. यात सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग राजपूत यांच्या हाताच्या बोटास जखम झाली. त्यामुळे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांत राजपूत यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे दाखल झाले.