ग्वाल्हेर – बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून मध्यप्रदेशच्या सरकारी प्राथमिक शाळेतील एक शिक्षक रडारवर आला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याच्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यावेळी तो तब्बल 27 महाविद्यालयांचा मालक असल्याचे उघड झाले.
बेहिशेबी संपत्तीवरून छाप्यांचे लक्ष्य बनलेल्या शिक्षकाचे नाव प्रशांत परमार असे आहे. डी.एड आणि बी.एडचे शिक्षण देणारी महाविद्यालये तो चालवतो. त्याची 4 कार्यालयेही आहेत. परमारकडे आतापर्यंत आढळलेली संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा 1 हजार पटींनी अधिक आहे.
प्राथमिक तपास आणि छापासत्रांतून त्याच्याकडे 10 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता आढळली आहे. त्या संपत्तीमुळे तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत. छापासत्रांदरम्यान काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.
संबंधित कारवाई आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परमार याच्या कारनाम्यांमध्ये कुणी बडी मंडळी सामील आहेत का याचा शोधही तपास यंत्रणा घेत आहेत.