नवी दिल्ली – देशात 10 ते 17 वर्षे वयोगटातील तब्बल 1.58 कोटी मुले व्यसन करतात, अशी माहिती केंद्र सरकारकडून बुधवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केलेल्या सर्वेक्षणातील सविस्तर अहवाल सादर करू, असेही सांगण्यात आले.
केंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 2016च्या निकालानंतर अंमली पदार्थांच्या वापराची व्याप्ती आणि सेवनाबाबत देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात देशात सुमारे 16 कोटी लोक अल्कोहोलचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी 5.7 कोटींहून अधिक व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. याशिवाय देशभरात 3.1 कोटी लोक गांजाचे व्यसन करत असल्याचे निदर्शनास आले आहे.सामाजिक न्याय मंत्रालयाने अंमली पदार्थांच्या वापरावरील राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय सर्वेक्षण केले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.