नवी दिल्ली – केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून जाहिरातीबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गेल्या 8 वर्षांत तब्बल 6 हजार 400 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज संसदेत सांगितले.
विविध वृत्तपत्रे तसेच दूरचित्रवाहिन्यांना दिलेल्या जाहिरातींच्या खर्चाचा तपशील अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत दिला. त्यानुसार 2014-15पासून 7 डिसेंबर 2022 या कालावधित मोदी सरकारने तब्बल 6400 कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यात प्रिंट मीडियातील जाहिरातींसाठी 3138.81 कोटी रुपये, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाहिरातींसाठी 3260.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि, विदेशी माडियावर जाहिरात देण्यासाठी खर्च करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनच्या माध्यमातून 2014-15मध्ये प्रिटं मीडियातील जाहिरातींवर 424.84 कोटी रुपये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातींवर 473.67 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2015-16मध्ये प्रिंट मीडियावर 508.22 कोटी रुपये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर 531.60 कोटी रुपये, 2016-17मध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील जाहिरातींवर अनुक्रमे 468.53 कोटी आणि 609.60 कोटी रुपये, 2017-18मध्ये प्रिंट मीडियातील जाहिरातींवर 636.09 कोटी रुपये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर 514.28 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
वर्ष खर्च मीडिया
2018-19 429.55 कोटी प्रिंट
514.28 कोटी इलेक्ट्रॉनिक
2019-20 295.05 कोटी प्रिंट
317.11 कोटी इलेक्ट्रॉनिक
2020-21 197.49 कोटी प्रिंट
167.98 कोटी इलेक्ट्रॉनिक
2021-22 179.04 कोटी प्रिंट
101.24 कोटी इलेक्ट्रॉनिक
2022-23मध्ये 7 डिसेंबर 2022पर्यंत प्रिंट मीडियावरील जाहिरातींसाठी 91.96 कोटी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर 76.84 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.