पिंपरी – अवघ्या बारा वर्षांच्या लहान मुलीचे 23 वर्षीय तरुणासोबत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या भावाने या प्रकरणी कुटुंबीयांचा विरोध झुगारत पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजता पवारनगर, थेरगाव येथे घडला.
विजय शंकर जाधव (वय 48, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ), दोन महिला, केशव अच्युत चव्हाण (वय 23, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर), अच्युत चव्हाण, केशव चव्हाण याची बहीण, ब्राह्मण आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या 20 वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीची लहान बहिण (वय 12) हिचा विवाह केशव चव्हाण याच्यासोबत लाऊन दिला. या लग्नासाठी सर्व आरोपी हजर होते. लग्नाच्या दरम्यान फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना या प्रकाराबाबत कोणास काहीही न सांगण्याबाबत धमकावले. फिर्यादी हे घाबरल्याने काही दिवस त्यांनी तक्रार देण्यास टाळले. नंतर फिर्यादी यांनी आईला सोबत घेऊन वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला.