फातिमानगर चौकात अपघात; आठ वर्षीय मुलालाही दुखापत
पुणे – पुणे-सोलापूर रस्त्यावर फातिमानगर परिसरात मंगळवारी (दि. 21) सायंकाळी एसटी बसचे ब्रेक निकामी झाले. बसने दोन मोटारी आणि पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अपघातात आठ वर्षांच्या मुलासह सहा जण जखमी झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
एसटी बस सांगोल्याहून स्वारगेटकडे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास निघाली होती. फातिमानगर परिसरातील काळूबाई मंदिर चौकाजवळ एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसने दोन मोटारी आणि पाच दुचाकींना धडक दिली. अपघातात मोटारीतील आठ वर्षांच्या मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या अपघातात मोटारचालक हरी गोपाळ बांगरिया (वय 40, रा. बिबवेवाडी), काका वाळुंजकर (40 ), अश्विनी वाळुंजकर (30), राजवर्धन वाळुंजकर (8 , तिघे रा. पुनावळे) जखमी झाले आहेत. या प्रकरणी एसटी चालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेण्यात आले आहे.