नेवासा – ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नेवासा शहरातील शेजूळ गल्ली प्रभागात घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या समुमारास उघडकीस आली. हर्षदा संतोष नारळे (वय 16 ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. हर्षदाने राहत्या घराच्या पाठीमागी टाॅयलेटमध्ये आत्महत्या केली.
मृत हर्षदाचे वडील संतोष नारळे नेवासा येथे आयकर सल्लागार सागर देशपांडे यांचेकडे मदतनीस म्हणून काम करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. यावेळी त्यांना हर्षदाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती फोनवरून मिळाली. तात्काळ त्यांनी घटनास्थळी जाऊन गळफास सोडविला आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नेवासा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.