मुंबई – भारतीय संघाच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून आता त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघासह दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
जे खेळाडू झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झाले होते त्यांच्या व्यतरीक्त जे खेळाडू आशिया स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत, त्यांच्यासह द्रविड व सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या अहवालात द्रविड यांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ मंगळवारी अमिरातीत दाखल झाला असून लक्ष्मण सध्या झिम्बाब्वेत असून ते थेट अमिरातीला रवाना होतील. या स्पर्धेला 27 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून भारताचा सलामीचा सामना 28 ऑगस्टला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. लक्ष्मण यांना झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले होते.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असले तरीही त्यांना पर्यायी मुख्य प्रशिक्षक म्हणून तयार केले जात आहे. लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय संघाशी जोडले गेले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यातही लक्ष्मणच मुख्य प्रशिक्षक होता. तसेच लोकेश राहुल आणि लक्ष्मण यांनी झिम्बाब्वेविरुद्ध निर्विवाद मालिका विजय साकार केला आहे.
संपूर्ण स्पर्धेलाच द्रविड मुकणार
करोनाची बाधा झाल्यामुळे द्रविड यांना अमिरातीला पाठवले जाणार नाही. तसेच काही दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाणार आहे. मात्र, यासाठी काही कालावधी आवश्यक आहे त्यामुळे आशिया करंडक स्पर्धेसाठी द्रविड जाणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. लक्ष्मण हे संघाचे प्रशिक्षक म्हणून तेथे उपस्थित असतील.