डोंगरगड (छत्तीसगड) – नागपूरला जाणाऱ्या शिवनाथ एक्स्प्रेस या रेल्वे गाडीच्या दोन बोगी छत्तीसगडमधील डोंगरगड येथे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. तथापि, यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज पहाटे 3.42 वाजता घडली.
सदर गाडी अत्यंत संथ गतीने जात असल्याने सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तांत्रिक पथकाने रि-रेलिंगची प्रक्रिया सुरू केली. वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले.
तांत्रिक पथकाला, बाधित डबे वेगळे करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. त्यानंतर पहाटे 5:45 वाजता गाडीने पुढील प्रवासाला सुरुवात केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी रात्री भुवनेश्वर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या पाच वॅगन रुळावरून घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता.