Shivsena dasara mealava – मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानात 1966 पासून दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून, पक्षात उभी फूट पाडली. शिंदे 40 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्याने आणि दोघांनीही आम्ही खरी शिवसेना म्हणत गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणार म्हंटले होते.
यासाठी कायदेशीर बाबी पार पाडून अंतिम निकालाअंती उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली तर शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील वांद्र्याच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर घेण्यात आला होता.
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोण घेणार यावरून आता चर्चा सुरु झाली असून कायदेशीर बाबी पार पाडण्यासाठी तयारी देखील सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया करण्यात आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत.
ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी दीड महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही अर्ज केला आहे. त्यामुळे शिंदे की ठाकरे, कुणाला परवानगी द्यायची? असा पेच मुंबई महापालिकेसमोर उभा राहिला आहे. ठाकरे गटाचे दादरचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्याकडून शिवाजी पार्क मैदान ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षासाठी मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्याच्या सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तसेच, पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून एक पत्र मुंबई महापालिकेला पाठवले जाणार आहे.
जर दोन दिवसांत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय नाही दिला, तर मात्र वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार ठाकरे गट पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परवानगी अर्ज दाखल केल्याने प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2022 रोजी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानाची जागा दसरा मेळाव्यासाठी मिळाली. मात्र, त्यासाठी ठाकरे गटाला मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावावे लागले होते.
शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया –
शंभूराज देसाई म्हणाले की, “शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा होतो. आज तारखेला नियमाने, कायद्याने पक्षाला मान्यता देण्याचे, त्यांचे चिन्ह निश्चित करण्याचे अधिकार घटनेने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्या निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचे म्हटले आहे.
शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवेसनेला शिवसेनेचं पारंपरिक धनुष्यबाण चिन्ह दिलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत जसे धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होत होता, तसाच शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील अधिकृत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा याकरता आम्ही सर्व कागदपत्र स्थानिक महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला आहे. कायद्याच्या बाजू तपासून, अधिकृत बाजू कोणाची आहे हे तपासून आम्हाला परवानगी मिळेल याची खात्री आहे.”
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
जिथेही शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तिथे इतिहास होतो. 50-55 वर्षापासून आम्ही दसरा मेळावा घेतोय. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत. शिवसेनेची, मराठी माणसाची ताकद कमी करणे हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचे आव्हान उभे केले जात आहे. तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचे काम केले, दिल्लीतून आर्मी बोलावली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच.
सदा सरवणकर काय म्हणाले ?
मी दरवर्षी दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळावं म्हणून मुंबई महापालिकेला अर्ज करतो. मी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे. मला अजून महापालिकेकडून कोणतही उत्तर आलेलं नाही. महापालिकेकडून उत्तर आल्यानंतर पुढे काय करायचं ते बघू. जर त्यांनी शिवाजी पार्क नाकारलं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तो निर्णय घेतील.
महेश सावंत काय म्हणाले ?
मागच्या वर्षी थाटामाटात आम्ही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा केला होता. मुंबई महापालिकेने आम्हाला शेवटपर्यंत शिवाजी पार्कसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो. मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्याकडे आहे. त्याची परवानगी आम्ही या वर्षीच्या पत्रात जोडली आहे. दीड महिन्यापूर्वीच आम्ही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी द्यावी असं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यात अडचण येणार नाही, असा विश्वास आहे.