ऐन थंडीत शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे हा ‘क्रूरपणा’; शिवसेनेकडून टीका

मुंबई – दिल्लीत कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर ऐन थंडीत गार पाण्याचे फवारे मारणे हा क्रूरपणा आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणे अतार्किक आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जात आहे आणि तिकडे काश्‍मिरात दहशतवाद्यांकडून जवानांच्या हत्या केल्या जात आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा खलिस्तानशी संबंध जोडण्याच्या प्रकारावरही शिवसेनेने टीका केली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांचे हे आंदोलन खलिस्तानशी संबंध जोडून बदनाम करण्याचा प्रकार केला असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. खलिस्तान हा संपलेला विषय असताना पुन्हा तो विषय उपस्थित करून भारतीय जनता पक्ष देशात पुन्हा अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकार बळाचा पूर्ण वापर करून विरोधकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे पण याच बळाचा वापर देशाच्या शत्रूनच्या विरोधात का केला जात नाही, असा सवालही शिवसेनेने केला आहे. गेल्या एकाच महिन्यात एकट्या महाराष्ट्रातील किमान अकरा जवानांना सीमेवर वीरमरण आले आहे, याकडेही शिवसेनेने भाजपचे लक्ष वेधले आहे.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा उभारला आहे. पण त्यांच्या हे लक्षात नाही की पटेल हेही एक शेतकरी नेते होते. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची अनेक आंदोलने केली.

आज त्यांच्याच देशात शेतकऱ्यांना मिळणारी ही वागणूक पाहून पटेलांचे डोळेही पाणावले असतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. ईडी आणि सीबीआय यांचा राजकीय वापर करण्यापेक्षा त्या संघटनांनाही आता देशाच्या शत्रूंच्या विरोधात लढण्यासाठी सीमेवर पाठवण्याची सूचनाही शिवसेनेने या अग्रलेखात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.