कॉंग्रेस सदस्यांच्या अनुपस्थितीत भाजप सरकारचे बहुमत सिद्ध
भोपाळ – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी शिवराजसिंह चौहान यांनी शक्तिपरीक्षा जिंकली. कॉंग्रेस सदस्यांच्या अनुपस्थितीत भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले.
कॉंग्रेसला बंडामुळे मध्य प्रदेशची सत्ता गमवावी लागली. त्यामुळे त्या राज्यात सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. अपेक्षेप्रमाणे शिवराजसिंह यांनी सोमवारी रात्री चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेतील संख्याबळ अनुकूल असल्याने त्यांनी शक्तिपरीक्षाही सहजपणे जिंकली. बसप आणि सपच्या मिळून 3 आमदारांनी तसेच 2 अपक्षांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला. आणखी 2 अपक्ष आमदार शक्तिपरीक्षेवेळी अनुपस्थित राहिले.
मध्य प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे. कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या 22 आमदारांचा राजीनामा आणि 2 रिक्त जागांमुळे सध्या विधानसभेतील संख्याबळ 206 पर्यंत खाली आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवराज यांना 104 आमदारांचे पाठबळ आवश्यक होते. सध्या भाजपचे 107 आमदार आहेत. त्यामुळे शक्तिपरीक्षा जिंकणे शिवराज यांना जड गेले नाही. त्यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.